Monday, July 26, 2010

Pragati Ani Jinvijay :: 23 july 2010 :: Issu 27  ( Dakshin Bharat Jain Sabha )


शांतिसागर वाणी 

युद्ध आणि बुद्ध

आकांक्षाची पुरती अथवा अन्याय दूर करण्यासाठी  कषाय तीव्रतेने जी गोष्ट केली जाते ती म्हणजे युद्ध. अनेक कारणासाठी युद्धे होत आली आहेत. युद्धाची प्रकार कोणतेही असो पण त्यात प्रामुख्याने राग-द्वेशांचेच प्राबल्य दिसून येते. कोणत्याही समश्याचा तोडगा युद्ध होऊ शकत नाही. युद्धात विजय जरी मिळवता आला तरी युद्धामुळे अनेक गोष्टी गमवाव्या लागतात हे निश्चित आहे. प्राचीन काळी युद्धात शस्त्रांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जायचा. आधुनिक युगात प्रगत शस्त्रास्त्रांचा कोणाचीच ओळख नसते. ती ज्यांचावर चालवली जातात त्यांचा ती घातच करतात. खूपवेळा युद्धाने अधोगतीच झालेली पाहायला मिळते. ज्याला शांतीचा मार्ग तत्वज्ञानाच्या आधारे सापडतो त्यांना बुद्ध म्हणतात. जेथे बुद्धाची शांती प्रस्तापित होते तेथे युद्धाचा अभाव होतो. युद्धाऐवजी बुद्धाचा विचार प्रत्येकवेळी झाला तर युद्धाचे प्रसंग येणारच नाही.

खूपवेळा शाब्दिक युद्धाने मोठ्या संग्रामाची सुरुवात होते. शब्दयुद्धाला ग्रामीण भाषेत भांडण म्हटले जाते. गैरसमजामुळे अथवा तीर्स्कारामुळे शाब्दिक युद्धाची सुरुवात होत असते. अशा भांडणात प्रखर शब्दांचे  प्रहार शस्त्रास्त्रांसारखे केले जातात. शब्दयुद्धात लोक खूपवेळा घायाळ होतात. त्यांच्या अंतर्मनातील जखमा लवकर भरून येत नाहीत. शब्दांच्या अस्त्राने झालेल्या जखमा सतत ताज्यातवान्या राहतात. भांडणाची भूमिका म्हणजेत युद्धाची भूमिका असते. कुरापतीखोर वृत्ती युद्धाची सुरुवात करण्यास कारणीभूत होऊ शकते. युद्धाचे प्रसंग टाळण्यासाठी आपण तत्वज्ञानाचा आधार घेतला पाहिजे. तत्वज्ञानाची संततधार ज्याच्या अंतकरणात सतत सुरु असते अशा व्यक्तीला बुद्ध्त्वाची प्राप्ती लवकर होत असते. जगातल्या प्रत्येकाला अशी बुद्ध्त्वाची प्राप्ती करून घेता येते. बुद्ध्त्वाची प्राप्ती झालेल्या शरीर्धारीला संसारिक दुखाचे चटके बसत नाहीत. प्रत्येकवेळी मनाप्रमाणे नाही घडले तर युद्धाला (भांडणाला) तत्पर होऊ नका. युद्धापेक्षा बुद्ध श्रेष्ठ आहे. लवकरात लवकर आपल्यातील बुद्ध जागृत करा. हा बुद्ध तुमच्या जीवनात नेहमीच शान्तिदुताचे कार्य करील.
बा. ब्रं. संजयजी गोपलकर


**************************************************************************

संपादकीय

पुण्यप्रेरक वर्षायोगाचे स्वागत

'आयुभांन्विर्ती शुभे प्रवृत्ती: व्रतमितीशते '
अशुभ कार्यापासून निवृत्त आणि शुभ कार्य करण्यासाठी प्रवृत्ती होणे, यालाच 'व्रताचरण' असे म्हणतात. आपल्या हातून अशुभ गोष्टी घडू नयेत - पापकर्म होऊ नये; वाईट घटना घडू नयेत, असे सर्वांनाच मनापासून वाटते. पण प्रत्यक्षात आचरण मात्र तसे घडत नाही. याउलट आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडाव्यात - सत्कर्मे व्हावीत; पुण्य्वार्धक कार्य व्हावे, अशी सद्भावना सर्वांचीच असायला पाहिजे. या सदाचरनासाठी आणि पूजा अर्चा, उपास- तापास, वृत्त वैकल्ये, नोपी इ. धर्माचरनासाठी अत्यंत अनुकूल असा कालावधी, म्हणजे 'चातुर्मास' होय. या चातुर्मासाचे म्हणजेच वर्षायोगाचे आम्ही सश्रद्ध भावनेने स्वागत करतो! श्रावक-श्राविका व मुनी अर्यिका या चातुसंघाचा वर्षायोग, पुण्यप्रेरक होवो यासाठी सुभेछ्या देतो.

आषाड महिन्याच्या शुद्ध अष्टमी या दिवशी, श्रावक-श्राविकांचा अश्ठान्हिक पर्वारंभ म्हणजे चातुर्मासास आरंभ होतो. सर्व त्यागीगनांचा चातुर्मासारंभ, आषाढ शुद्ध चातुर्दासी म्हणजे अश्तान्हिक पर्व समाप्ती दिवसी होतो आणि अश्विन वद्य चादुर्दशी या दिवसी चातुर्मास संपतो. हा चार महिन्याचा कालावधी साधारणता: पावसाळ्यामध्ये येतो-वर्षा ऋतूत येतो; म्हणून याला वर्षायोग असेही म्हणतात.

श्रावक आणि त्यागीगन यांचे आचरण कसे असावे ? यासंबधी  रत्नकरंड श्रावकाचार, सागार धर्मामृत, अनगार धर्मामृत इ. धर्मग्रंथामध्ये आचार्यांनी सविस्तर सांगितले आहे.

साधू संताचा उपदेश ऐकणारे, सत्य-अहिन्सादी अनुव्रताचे काटेकोरपने पालन करणारे आणि सदैव शुभ कार्य करणाऱ्या श्रावक म्हणतात. देवपूजादी सत्कर्मे करणारा असा हा श्रावक श्रद्धावान असावा, विवेकाने वागवा आणि क्रियाशील असावा; परंतु असे चित्र समाजात दुर्मिळ दिसते; असे नाईलाजाने म्हणावे लागते.

इंद्रियविषय वासनावर विजय मिळविणारे, सर्व प्रकारच्या परीग्रहांचा त्याग करणारे आणि ज्ञानसाधना, ध्यान धारणा तथा इछ्या विरोधी तापामध्ये मग्न असणारे खरे तपस्वी साधू म्हणून ओळखले जातात. अशा तपस्वी मुनी-आर्यीकानी सत्य- अहिसाडी महाव्रतांचे अत्यंत काटेकोरपणे आचरण केले पाहिजे. कारण...

सर्व शास्त्रामध्ये आचार (आचरनच) श्रेष्ठ असल्याचे सांगितले आहे. म्हणूनच म्हणतात "आचार प्रथमो धर्म: ! आचार परमो धर्म: !' म्हणजे आचरण हा प्रथम धर्म आहे- सर्व श्रेष्ठ धर्म आहे."

या वर्षायोगामध्ये त्यागीगन आहार-विहारासाम्ब्धी काही नियम घेतात आणि व्रते धारण करतात. त्यांचे वास्तव्य एका ठिकाणी असते- दूरवरचा ते विहार करीत नाहीत. कारण पाउस पाणी, चिखल इ. मधून विहार केल्याने जीव हिंसा होते. अशी कोणत्याही प्रकारची हिंसा न झाल्याने 'अहिसा' या महाव्रताचे पालन त्यांच्या हातून होऊ शकते. एकाच गावात किंवा क्षेत्राच्या ठिकाणी त्यागीन्चा चातुर्मास असल्याने, रोज त्यांची धर्म प्रवचने होऊ शकतात. अशा प्रवचनातून अथवा धर्मोपदेशातून त्यांनी समाज जागृती करून, समाज संघटीत केला पाहिजे. समाजाचे तन-मन-धन हे सामाझीतासाठीच उपयोगात आणले पाहिजे. विशेषत: दानधर्माच्या रूपाने लक्षवधी रुपये मुनीच्या सांगण्यावरून भक्तजन देत असतात. त्या पैशातून गावोगावी पाठशाला निर्माण करव्यात, ज्यामुळे लहान मुलांवर धार्मिक तथा नैतिक संस्कार होतील. शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) येथील "भ. महावीर अध्यासन केंद्र" याला मोठ्या प्रमाणात देणग्या देण्यासाठी मुनी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून श्रावकांना प्रवृत्त करावे. कारण सादुसंतांच्या सांगण्यावर श्रावाकांची श्रद्धा असते. म्हणून ' दानं दुर्गती  नाशाय' यासाठी श्रावक श्राविका देणग्या देतात. त्यामुळे भ. महावीर अध्यासन केंद्रामधून जैन धर्म तत्वज्ञान, आचार-विचार, श्रमण-संस्कृती इ. संबंधी जैन विद्येचा सखोल अभ्यास व संशोधन होऊ शकेल. मंदिर, मूर्ती प्रतीष्टापना, पंचकल्यानिक तथा विविध आराधना महोत्सव इ. साठी जो पैसा खर्च होतो; त्या बरोबरच, "जैन विद्येचा सर्वांगीण विकास' यासाठीही देणग्या देण्याबाबतीत, आपल्या सर्व मुनीजनानी आणि प.पु. भट्टारकरत्न  स्वस्तिश्री लक्ष्मिसेन महास्वामी आणि प.पु. भट्टारक पट्टाचार्य जिनसेन  महास्वामी यांनी, आपल्या प्रव्चानामधून आग्रहाने श्रावक- श्राविकाना सांगितले पाहिजे. कारण कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव या भागातील " जैन समाजाचा मानबिंदू म्हणजे भ. महावीर अध्यासन केंद्र' आहे. याचा सर्वांगीण विकास हे आपण सर्वांचेच ध्येय असले पाहिजे !
प्राचार्य श्रीधर हेरवाडे

**************************************************************************


विशेष संपादकीय

जैनहो सावधान 'नवाकाळ' सोकावतोय...

प्रगतीच्या वाचकांना शीर्षक वाचून कदाचित आश्चर्य वाटेल कि, जैनांनी सावधान होण्यासारखी काळासबंधी अशी आणखी कोणती गोष्ट घडली आहे ? नवाकाळ तर बदलत्या काळाचे स्वरूपच आहे. नव्या उगत, नव्या काळात बदल हे होणारच ! आज आम्ही बदलत्या कालासबंधी बोलत नाही कि धर्माचरण किती बदलले आहे म्हणून धर्मबुडी होईल यासबंधीही लिहित नाही. मुंबईमधून प्रसिद्ध होणाऱ्या "नवाकाळ" दैनिकात शनिवार दि. १९ जून २०१० रोजी पहिल्याच पानावर एक भडक संपादकीय प्रसिध्द झाले आहे. त्याचे शीर्षक आहे "जैनाची दादागिरी थांबवायलाच हवी" दैनिकाच्या संपादिका सौ. जयश्री खाडिलकर यांना बहुतेक जैनद्वेषाची कावीळ झाल्यामुळे त्यांनी सदर संपादकीयामध्ये जैनासबंधी गरळ ओकली आहे.

मुंबईमध्ये जैन लोक शाकाहाराचा प्रचार-प्रसार मोठ्या प्रमाणावर करत आहेत. त्यामुळे मांसाहारी लोकांना हॉटेल आणि बेकारीमध्येही शाकाहारीशिवाय इतर पदार्थ मिळेनासे झाले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. जैन पिझ्झा, जैन बर्गर, जैन वडापाव आणि इतर जैन पदार्थांचे वर्चस्व वाढल्यामुळे मांसाहारी लोकांची पंच्यात झाली आहे असे त्यांना वाटते. पैशाच्या जोरावर जैन लोक असा प्रचार करत असल्याचा साक्षात्कारही त्यांना झाला आहे. याशिवाय जैन लोक मुंबईमध्ये थैल्यांच्या जोरावर आपल्या फ्ल्याट जवळ मांसाहारीना प्रवेश देत नसल्याची त्यांची तक्रार आहे. फक्त शाकाहारींनाच फ्ल्याट देऊन जैन लोक पैशाच्या थैलीचे वजन ठेऊन भारताची घटना वाकवत असून शासन हे सर्व गप्पपने पाहत बसले आहे असा त्यांचा दावा आहे.

जगभर शाकाहाराचा प्रचार होत असताना जैनांचा शाकाहार पटण्यासारखा नाही असे का व्हावे ? अनेक प्रकारे शाकाहाराचे महत्व पटल्यामुळे अधिकाधिक  लोक शाकाहाराचा स्वीकार करत आहेत. नैरोबीसारख्या मांसाहारलोलपी लोकांच्यातही आता शाकाहाराची बीजे रुजू लागली आहेत. जगात फक्त जैन लोकच शाकाहार करतात असे नसून जैनेतर लोकांच्यातही शाकाहाराची जागृती वाढली आहे. डॉ. ये. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासारखे भारतीय माजी राष्ट्रपतीसुद्धा शाकाहाराचाच पुरस्कार करतात. भारतातल्या पंतप्रधानांना शाकाहारच आवडतो म्हणून खास त्यांच्यासाठी अमेरिकेतील राष्ट्रपती भवनात शाकाहारी भोजन बनविण्यात येते. ही एकविसाव्या शतकातील विशेष गोष्ट नाही काय ?  प्रत्येक शाकाहारीला आपल्या शेजारी आपल्यासारखाच शाकाहारी असावा असे वाटले तर त्यात कोणता गुन्हा आहे ? संपूर्ण जगभर शाकाहार,मांसाहार मिश्र व फक्त शाकाहार अशी भोजन व्यवस्था असणारी हॉटेल्स आहेतच. देश्यातील प्रत्येक हायवेवर नजर टाकली तर अधिकाधिक ठिकाणी ढाबेच ढाबे उभे राहिलेले दिसतात. अशा गोष्टीकडे डोळेझाक करून फक्त शाकाहारी जैनांची संख्या वाढत आहे म्हणून त्यांना टार्गेट करणे कितपत योग्य आहे ? बाजारात मागणी तसा पुरवठा होत असतो. हे संपादक महोदया पूर्णपणे वीसरलेल्या दिसतात. मुंबईत जर लोकांना मांसाहाराचीच आवड अधिक असती आणि लोकांनी त्याचीच  खरेदी करण्यासाठी गर्दी केली असती तर मांसाहारी दुकानाची संख्या आपोआपच वाढली असती. मुंबईत असणारी हॉटेल्स व बेक्ऱ्या केवळ जैनासाठीच उघडल्या आहेत काय ? याचाही विचार केला पाहिजे. केवळ एका धर्माच्या लोकासाठी अशी दुकाने असणे शक्यच नाही. जयश्री ताईनी शाकाहाराचे महत्व समजून घेतले तर साऱ्याच गोष्टींचा उलघडा त्यांना निश्चितच होईल. सात्विक आहार घेणारे जैन जर एकत्र राहण्यासाठी जैनानांच आपले शेजारी बनवत असतील तर त्यांच्या एकत्र राहण्याला साम्राज्याची उपमा कशी देता येईल. एखाद्या हिंदू संताने मराठा तितुका मिळवावा असे म्हंटले तर ते संतवचन होते. त्याला अन्यायाचा वास येत नाही. मात्र जैन लोक शेजारी शेजारी राहिले तर ते इतरांच्यावर अन्यायकारक होऊ शकेल काय ? आम्हाला तर असे वाटते कि, जैनांनी नेहमी जैनांच्या शेजारी राहावे. अशा एकत्रित राहण्यामुळे जैन संस्कृती टिकून राहील. जैन संस्कृतीचा विकास होईल. इतर लोकांच्यात  राहण्याने आपल्या मुलाबालावर जैनत्वाचे संस्कार होऊ शकत नाहीत. अशा मुलांच्या मनात जैन धर्माबद्दल अधिक प्रमाणात आस्था उत्पन्न होऊ शकत नाही. 

जैनांची अनेक कुटुंबे धंदा, व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने अनेकठिकाणी विखुरलेली आहेत. खूपवेळा अशा कुटुंबाना परिस्थितीनुरूप जमवून  घ्यावे लागते. अशावेळी मुलांच्यावर सुयोग्य संस्कार होऊ शकत नाहीत. मांसाहारी कुटुंम्बांच्यात या मुलांची सतत ये-जा सुरु राहिली की, अशा मुलांना पुढे मांसाहाराचा विधीनिशेद रहात नाही. बहुजन समाजात वावरायला, व्यवसाय करायला, नोकरी-चाकरी करायला आमचा मुळीच विरोध नाही. पण राहणे आणि भोजन यासारख्या गोष्टी मात्र बहुजन समाजात होऊ नयेत असे आम्हाला
वाटते.

नवाकाळ म्हणतो, जैनांची श्रीमंती मुंबईकरांच्या मुळावर उठली आहे. पण आम्हास तर असे वाटते जैनांच्याकडे पैश्याच्या श्रीमंतीबरोबरच मनाचीही श्रीमंती खूप मोठी आहे. जैन लोकांची दानत खूप मोठी आहे. जैन लोकांनी चालविलेल्या सामाजिक संस्था अधिक कार्यक्षम दिसून येतात. जैन लोकच देशात सर्वाधिक ट्याक्स भरतात. यामुळेच आपल्या सर्वांचा विकास समतोल प्रमाणात होताना दिसतो. मुंबई गर्भश्रीमंत जैनांच्या मुठीत चाललेली आहे असा जो गैरसमज खाडिलकर ताईंचा झाला आहे तो त्यांनी दुरुस्त करून घ्यावा. मुंबईत जैनांच्याबरोबरच अनेक गर्भश्रीमंत लोक आहेत, ते सुद्धा मुंबईत जागा खरेदी करत आहेतच. मग त्यांना कोणी गैर मनात नाही. जैन समाज, जैन देवता, जैन शास्त्र, जैन साधू आणि जैन संदेश- उपदेश याबद्दल जैनेतर लोकात खूपच भ्रामक समजुती निर्माण होत आहेत. खेड्यातील लोकांनी या गोष्टी जशाच्यातश्या अनुभवलेल्या असल्यामुळे सर्व समाज खेड्यात गुण्यागोविंदाने नांदत असतो. पण शहरी लोकामधील काही भ्रमिष्ठ लोकांना याचा अभ्यास नसल्याने समाजात अकारण कटुता निर्माण होते. जैन समाजाने स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंत राष्ट्रविकासात मौलिक भूमिका बजावली आहे. कृषी क्षेत्र असो की व्यावसाईक क्षेत्र असो सर्वच क्षेत्रात उतुंग कामगिरी करून देशवासियांना अधिकाधिक विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. जैन धर्मातील अहिंसा, सत्य, अपरिग्रह या तत्वांचा प्रभाव गांधीजींच्या मनावर झाला आणि त्यांनी अहिंसक लढा लढून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. जैन समाजात आणि इतर समाजात असणारी गुन्हेगारी पाहीली तर सहज लक्षात येईल की जैन समाज अधिकाधिक निष्कलंक जीवन जगतो. जैन समाजाला सामाजिक शांततेचे भान असल्याने आजपर्यंत त्यांच्यावर राजकीय स्वरूपाचे कितीही अन्याय झाले तरी तो रस्त्यावर उतरला नाही. जैनांनी आजपर्यंत दंगल, जाळपोळ केल्याचे एकही उदाहरण नाही. जैन समाज हिंसक वृत्तीचा नाही त्यामुळे जैनांच्या विरोधात कोणतेही राजकारण होवू नये. अहिंसेचा पुजारी आणि सत्याची कास धरणारा जैन समाज अध्यात्मिक क्षेत्रात आपला ठसा उमठ्वून सर्वोच्च शिखरावर बसला आहे. अशा शांतताप्रिय समाजाला कोणी कोणत्याही वादाच्या भोवऱ्यात अडकवू नये.

जैनहो, आपण जर वेळीच सावध झालो नाही तर येणारा काल आपल्याला कलंकित केल्याशिवाय राहणार नाही. नव्या काळाची पाऊले वेळीच ओळखून जैन जैनेतर अशी विभागणी करण्याच्या नावावर जैनांचे खच्चीकरण केले जावू शकते. नव्या काळासोबत जाणारे आमचे जैन बांधव जर समाजापासून विखरून दूर राहिले तर आपले जैनत्व कमी होण्याचा किंवा नाहीसे होण्याचा धोका वाढणार आहे. केवळ जैनद्वेशातून भडक लिखाण करून अहिंसक जैनांना बदनाम करण्याचा चालविलेला प्रयत्न वेळीच थांबवायला हवा. जैनहो तुम्ही नव्या काळाबरोबर चालताना तीर्थकरांचा जुना काल आणि पुर्वज्यांचा जुना काळ विसरून चालणार नाही. हे लक्षात ठेवा.
ब. ब्रं. संजयजी गोपलकर

1 comment:

  1. Nandhre madhye gelya mahinyat dangal zali (June 2011). Tyat Jainancha Sahbhag Hota. Check Karun Bagha.
    नांद्रे मध्ये गेल्या महिन्यात दंगल झाली. ती जैनांनी केली होती. त्यात जैनांचा सहभाग होता. चेक करुन बघा. लिंक खाली दिलेली आहे.
    http://www.google.co.in/search?hl=en&gbv=2&biw=1024&bih=578&q=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87+%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2+&oq=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87+%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2+&aq=f&aqi=&aql=&gs_sm=e&gs_upl=103414l104553l0l104738l2l2l0l0l0l0l373l373l3-1l1

    ReplyDelete